पुण्यातील एचईएमआरएल, एआरडीईचा उपक्रम
पुणे / नवी दिल्ली – स्वदेशी बनावटीच्या लेझर गाईडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी करण्यात आली. एमबीटी अर्जुन या रणगाड्यावरून अहमदनगर इथल्या केके रेंज इथे ही चाचणी घेण्यात आली. याआधी 22 सप्टेंबर रोजी अशी चाचणी घेण्यात आली होती. अनेक प्लॅटफॉर्मवरून सोडण्याची क्षमता राखणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या सध्या तांत्रिक मूल्यांकन चाचण्या सुरू आहेत.
पुण्यातील हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरॅटरी (एचईएमआरएल) आणि डेहराडून येथील इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (आयआरडीई) यांच्या सहकार्याने पुण्यातील आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅबलिशमेंट (एआरडीई) यांनी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
नुकतेच कमी अंतरावरील रणगाडा भेदण्यासाठीची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. गुरुवारी (दि.1) लांब अंतरावरील शत्रू रणगाडा भेदण्याबाबत यशस्वी चाचणी लष्करातर्फे करण्यात आली.
यासाठी लष्कराच्या एमबीटी अर्जुन या रणगाड्याचा वापर करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.