जळगाव- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व आरोपींना दोषी जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
दुपारनंतर जिल्हा न्यायालय या सर्वांना शिक्षा जाहीर करणार आहे. हे प्रकरण अनेक वर्षांपासून रखडलेल्या होते. न्यायालयात न्यायाधीशांनी आरोपींच्या वकिलांना, तुम्हाला काही मांडायचे आहे का? असे विचारले. त्यावर आरोपींच्या वकिलांनी आरोपींचा या घरकुल घोटाळ्याची कोणताही संबंध नाही, ते आता वयोवृद्ध आहेत असेच म्हणत जोरदार युक्तीवाद केला.
आरोपींना विविध व्याधी आहेत म्हणून त्यांना न्यायालयाने माफी द्यावी, असा बचावात्मक पवित्रा त्यांच्या वकिलाने घेतला. यावर आरोपी असलेल्या सर्व नगरसेवकांनी कट-कारस्थान करुन हा गुन्हा संगनमताने केला, असे सरकारी वकिलांनी कोर्टापुढे मांडले. नगरसेवकांनी जागा नसताना घरकुलाचा ठराव का केला? तसेच आजवर या प्रकरणी ताब्यात असलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या व्याधी नाहीत.
लोकांचा पैसा असल्याने लोकांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे होता, असे प्रभावी मुद्दे मांजले. या प्रकरणामुळे लोकांच्या पैशाचा अपव्यय झाला असून यातील सर्व आरोपींना शिक्षा देण्यात यावी, असा सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला.