मुंबई – राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहेत. यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 करिता सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली. पंचायत समिती पुरस्कारामध्ये राहाता (जि.अहमदनगर) आणि मालवण (जि.सिंधुदुर्ग) पंचायत समित्यांची निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात 17 ग्रामपंचायतींचा समावेश झाला आहे. त्याचबरोबर बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीस आणि ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगरच्या लोहगाव या ग्रामपंचायतीला मिळाला आहे. तसेच नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2022 हा राज्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात मोदाळे (ता.इगतपुरी, जि.नाशिक), लोहगाव (ता.राहाता, जि.अहमदनगर), लोणी बुद्रुक (ता.राहाता, जि.अहमदनगर), कोतावडे (ता.कडेगाव, जि.सांगली), वाघोली (ता.मोर्शी, जि.अमरावती), बावी (कौल) (ता.जि.उस्मानाबाद), धारुर (ता.जि.उस्मानाबाद), शिरगाव (ता.कडेगाव, जि.सांगली), दरी (ता.जि.नाशिक), नेरी (ता.मोहाडी, जि.भंडारा), श्रृंगारवाडी (ता.आजरा, जि.कोल्हापूर), नन्व्हा (ता.सालेकसा, जि.गोंदिया), धोरोशी (ता.पाटण, जि.सातारा), झरी (ता.लोहा, जि.नांदेड), आरे (ता.गुहागर, जि.रत्नागिरी), मुठेवडगाव (ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), आणि खानापूर (ता.जि.उस्मानाबाद) या 17 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये, राहाता (जि. अहमदनगर) आणि मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि 17 ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात थेट खात्यात प्राप्त होणार आहे.
या श्रृंगारवाडी आणि लोहगाव ग्रामपंचायतीस प्रत्येकी 5 लाख रूपये थेट प्राप्त होतील. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या भंडारवाडी या ग्रामपंचायतीची नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामसभा गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस 10 लाख रूपये रक्कम पुरस्कार स्वरुपात थेट प्राप्त होईल.