Video : घरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी, तीही चक्क तुरुंगात

पुणे – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 1) घरच्या ‘मुख्यमंत्री’ सौ. आरती यांच्यासाठी सुंदर पैठणी खरेदी केली. केवळ नव्या वर्षाची भेट म्हणून गृहमंत्री देशमुख यांनी ही खरेदी केली नाही तर यामागे त्यांची सामाजिक दृष्टी होती. होय, कारण पैठणीची खरेदी गृहमंत्र्यांनी पुण्यातल्या प्रसिध्द तुळशी बागेत किंवा लक्ष्मी रस्त्यावरच्या एखाद्या भव्य दालनात केली नाही.

देशमुख यांनी शुक्रवारी पुण्यातील ऐतिहासिक येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या ठिकाणी बंदीवानांच्या श्रमातून बनणाऱ्या अनेक वस्तुंचे विक्री केंद्र आहे. याच केंद्रातून गृहमंत्री देशमुख यांनी तुरुंगातील बंद्यांनी विणलेली पैठणी आपल्या पत्नीसाठी खरेदी केली. पैठणी घेतल्यानंतर देशमुख यांनी आग्रहाने त्याची साडे नऊ हजार रुपये ही किंमतही अदा केली.

पैठणी खरेदीबद्दल विचारले असता देशमुख म्हणाले की, तुरुंगात येणारा प्रत्येकजण जन्मजात किंवा सराईत गुन्हेगार असतोच असे नाही. संतापाच्या भरात किंवा परिस्थितीमुळे काहींच्या हातून गुन्हा घडून जातो. त्यानंतर न्यायदेवतेने सुनावलेली शिक्षा ते भोगत असतात. पण म्हणून त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावला जात नाही.

केलेल्या चुकीची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना पुन्हा समाजात सामावून घ्यायचे असते. त्या वेळी त्यांना तुरुंगात केलेल्या श्रमदानाचा स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या केंद्रातून होणाऱ्या वस्तु विक्रीतून त्यांना मिळणारे उत्पन्न तुरुंगाबाहेरील नवे आयुष्य जगण्यास मदतीचे ठरू शकते, याच भूमिकेतून मी येरवडा कारागृहातील कैद्यांनी विणलेली पैठणी विकत घेतली.

“नागरिकांनीही या केंद्रातून त्यांच्या गरजेच्या वस्तू नियमित खरेदी कराव्यात. आपल्याच समाजातल्या वाट चुकलेल्या लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल,” असे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या जबाबदारीमुळे मी पोलिस नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसोबत होतो. पत्नी, कुटुंबासोबत मला राहता आले नाही. त्यामुळे ‘घरच्या मुख्यमंत्र्यां’चा लटका राग काढण्यासाठीही मला पैठणीचा उपयोग होईल, अशीही मिश्किल टिप्पणी गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.