टी-20 क्रिकेट स्पर्धा : न्यू क्रिकेट क्‍लबला विजेतेपद

अंतिम सामन्यात एव्हरग्रीन संघावर 34 धावांनी मात

पुणे – दानिश पटेलने केलेल्या नाबाद अर्धशतक आणि झैद पटेल, अच्युत मराठे व ऋषभ शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यू क्रिकेट क्‍लब (एनसीसी) संघाने एव्हरग्रीन संघाला 34 धावांनी पराभूत करताना एमसीईचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 

अंतिम लढतीमध्ये एनसीसी संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 216 धावांपर्यंत मजल मारली. दानिश पटेल याने 48 चेंडूत 81 धावांची नाबाद खेळी केली. त्याला सुजीत उबाळे (38), सुधाकर भोसले (35) व कुणाल सिंग (28) यांनी सुरेख साथ दिली. एव्हरग्रीन संघाकडून अतुल विटकर याने 4 षटकांत 45 धावाच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. तन्वीर शेख व अमर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

उत्तरार्धात एव्हरग्रीन क्‍लब संघाला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 182 धावाच करता आल्या. एव्हरग्रीन संघाकडून अतुल विटकर याने 45 चेंडूत 60 धावा, तर तन्वीर शेख 35 चेंडूत 41 धावांची खेळी करताना चांगली लढत दिली. अच्युत मराठे, ऋषभ शर्मा व झैद पटेल यांनी प्रत्येकी 2, तर प्रणित राणे, सुधाकर भोसले व सुजीत उबाळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दानिश पटेल याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुजीत उबाळे याला “सर्वोत्तम खेळाडू’, अच्युत मराठे याला “सर्वोत्तम गोलंदाज’ तर प्रसन्न मोरे याला “सर्वोत्तम फलंदाज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.