मालमत्ता खरेदी ही नेहमीच शुभदायी मानली जाते. आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी यासारखा दुसरा सुवर्णकाळ नाही. सद्यस्थितीत घराच्या किंमती वाजवी पातळीवर आलेल्या असताना घर खरेदीचा निर्णय अर्थातच फायद्याचा ठरु शकतो. रेरा कायदा लागू झाला असून परवडणाऱ्या घरांच्या योजनांतील ग्राहकांना सबसिडी देखील मिळत आहे. त्याचवेळी बिल्डरकडून ऑफर दिल्या जात आहेत.
व्यवहार अधिक आकर्षक आणि पारदर्शक करण्यासाठी काही बॅंका आणि हौसिंग फायनान्स कंपन्या बिल्डरसमवेत करार करुन ग्राहकांना अधिक सवलती देत आहेत. आकर्षक व्याजदरावर ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध होत असल्याने घर खरेदी आटोक्यात आल्याचे एकंदरित चित्र आहे. मात्र गृहकर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींचे आकलन करणे तितकेच गरजेचे आहे.
योग्य बॅंक निवडा: गृहकर्जाचा हप्ता कमी राहवा या उद्देशाने घर खरेदीदार हे कर्जफेडीसाठी दिर्घ कालावधी देणाऱ्या बॅंकेची निवड करतात. या माध्यमातून वीस ते तीस वर्षाचा कालावधी असल्यास ग्राहकांवर हप्त्याचा बोजा कमी राहतो, मात्र त्याचवेळी व्याजपोटी बरीच रक्कम बॅंकेच्या पदरात जाते. त्यामुळे हा सौदा नुकसानकारक ठरतो. याशिवाय कर्ज घेताना प्री-पेमेंट शुल्क, प्रक्रिया शुल्क, लोन क्लोजर शुल्क यासारख्या घटकांचीही माहिती घ्यायला हवी.
एकंदरित व्याजदर कमी आकारत असले तरी अन्य शुल्काच्या मार्फत त्याची वसुली तर होत नाही ना, याचा तपास करावा. त्यामुळे शक्यतो राष्ट्रीयकृत बॅंकांनाच कर्जासाठी प्राधान्य द्यायला हवे. हप्त्याचा कालावधी जेवढा कमी असेल, तेवढे व्याज कमी जाते.
याशिवाय ऑनलाइनवर बॅंकेच्या व्याजदराची तुलना करणारे अनेक संकेतस्थळ उपलब्ध आहेत. त्या आधारे देखील आपण बॅंक आणि वित्तिय संस्थेची निवड करु शकतो. म्हणून कर्ज घेताना केवळ व्याजाचा विचार करु नये तर यादरम्यान आकारण्यात येणाऱ्या अन्य शुल्काबाबतही विचार करावा.
सणासुदीच्या काळातील ऑफर चांगल्या; पण…. काही वेळा घर खरेदीसाठी आर्थिक तयारी पूर्ण नसली किंवा गृहकर्जासाठी पात्र ठरत नसले तरी काही ग्राहक सणासुदीच्या काळात ऑफरला हुरळून जावून घर खरेदीचा निर्णय घेतात आणि कर्जासाठी अर्ज करतात. सणासुदीच्या काळात बॅंक आणि बिल्डरंना लक्ष्य दिलेले असते आणि ते पूर्ण करण्यासाठी ग्राहकांसमोर ऑफरची जंत्रीच मांडतात. या ऑफरला भरीस पडून त्यातील तथ्य न तपासताच ग्राहक घर खरेदीचा निर्णय घेतात. डाऊन पेमेंट केल्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी आपल्याकडे पुरेशी तयारी आहे काय? हे देखील पाहिले पाहिजे.
गृहकर्ज हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून त्याचा घाईगडबडीत निर्णय घेणे नुकसानकारक ठरु शकते. काहींच्या मते सणासुदीचा काळ हा गंतवणुकीबराबेरच घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याचाही काळ मानला जातो. शून्य प्रक्रिया शुल्क, दोन वर्ष समान हप्ता, आकर्षक व्याजदर यासाऱ्या ऑफरचा समावेश असतो. या ऑफरचा फायदा घेऊन ग्राहकांनी घर खरेदीचा निर्णय घ्यायला हरकत नाही, मात्र त्या ऑफरमधील बारकावे आणि आर्थिक क्षमता याची समीक्षा करायला हवी. घर खरेदी फायद्याची आणि लाभाची ठरेल, यासाठी प्रसंगी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी.
ऑनलाइन ऑफरचे आकलन बॅंका आणि एनबीएफसीबरोबरच विविध ऑनलाइन लॅंडिंग प्लॅटफॉर्म्स देखील अनेक प्रकारच्या सवलती देत असतात. त्यात शुल्कात सवलती, व्याजदरात सवलत यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी पोर्टल्सच्या मदतीने घेतल्या जावू शकतात. म्हणून कर्जदारांनी अशा ऑफरचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे सर्फिंग करणे हिताचे आहे.
– प्रियांका जाधव