भाजपचा सावध पवित्रा : भूसंपादन मोबादला प्रक्रियेत बदल करण्याच्या प्रस्तावाला विरोध
पिंपरी – खासगी वाटाघाटीने भूसंपादन करून मोबादला देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या प्रस्तावामुळे भाजपमधील नगरसेवकांमध्येच दोन गट पडले आहेत. मोबदला देण्याच्या प्रक्रियेतील बदलामुळे अनेकांना अर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आपलेच नगरसेवक विरोधात भूमिका घेण्याची आणि वाद होण्याची भीती आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाने शुक्रवारी (दि.20) सर्वसाधारण सभा तहकूब करून तूर्तास हा गृहकलह चवाट्यावर येण्यापासून थांबविला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 20 नोव्हेंबर 2015 रोजी नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार 0 ते 300 चौरस मीटर मिळकतधारकांना 100 टक्के दिलासा व 300 चौरस मीटरपेक्षा अधिक भूखंड असलेल्या मिळकतधारकांना 30 टक्के दिलासा दिला जातो. त्यामध्ये खासगी वाटाघाटीने भूखंडाचे तुकडे पाडून मिळकतधारकांना लाभ दिला जातो. परंतु, त्यात बदल करून 20 नोव्हेंबर 2015 नंतर भूखंडाचे तुकडे केलेल्या मिळकतधारकांना सांत्वना रक्कम 30 टक्के इतकीच देण्याचा बदल स्थायी समितीने केला. त्यावरुन स्थायीत वादंग झाल्यानंतर हा प्रस्ताव भाजपाचेच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना अडचणीत आणण्यासाठी केला जात असल्याचा आरोप झाला.
या प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यांवर ब्लॅकमेल करण्याचाही आरोप झाला. मात्र, तरीही तो प्रस्ताव निर्णयासाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला. परंतु, सत्ताधारी भाजपच्याच अर्ध्याहून अधिक नगरसेवकांचा त्या प्रस्तावाला विरोध आहे. त्यात सभेपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नगरसेवकांनी या विषयावरून परखड भूमिका मांडली. अनेक नगरसेवक आक्रमक असल्याने सभेत त्यावरून गोंधळ होणार असल्याची स्थिती होती. तसेच, वाद झाल्यास सत्ताधारी भाजपमधील गृहकलह समोर येईल.
या भीतीने तूर्तास भाजपाने सभा तहकूब करून वेळ मारून नेली. मात्र, पुन्हा येत्या 6 जानेवारीला त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. या प्रस्तावावरून नगरसेवक विरोधात जाण्याचे भय आहे, तर दुसरीकडे भाजपा पदाधिकाऱ्यांवर हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दबाव आहे. परिणामी भाजपाला हा प्रस्ताव रद्द करणे शक्य नाही. हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणीही अनेक नगरसेवकांनी केली होती. मात्र एका व्यक्तीचे नुकसान करण्यासाठी संपूर्ण शहराच्या नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. अशी भाजपाच्या काही नगरसेवकांची भूमिका आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.