न्यूयॉर्क – हॉलिवूडमधील विख्यात अभिनेते सिडने पॉयटर यांचे वृद्धापकाळामुळे नुकतेच निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. पॉयटर यांच्या निधनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
हॉलिवूडमध्ये कृष्णवर्णिय कलाकारांसाठी दरवाजे खुले करण्याचे काम पॉयटर यांनी करून दिले. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये “टू सर विथ लव्ह’, “इन द पीट ऑफ द नाईट’ आणि “गेस हू इज कमिंग टू डिनर’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश होतो. त्यांनी एकूण 20 पेक्षा अधिक हॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
या व्यतिरिक्त त्यांना 1982 मध्ये “गोल्डन ग्लोब’ आणि 1992 मध्ये “लाईफटाईम अचिव्हमेंट ऍवॉर्ड’ देखील देण्यात आला होता. याशिवाय 2009 मध्ये अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते प्रेसिडेन्ट ऍवॉर्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
1963 साली प्रदर्शित झालेल्या “लिलीज ऑफ द फिल्ड’ मधील भूमिकेसाठी पॉयटर यांना अकॅडमी ऍवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.
सर्वोत्कृष्ठ अभिनयाचा पुरस्कार त्यावेळी प्रथमच एका कृष्णवर्णिय अभिनेत्याने पटकावला होता. नेमक्या त्याच वेळी अमेरिकेत नागरी हक्कांचे आंदोलन ऐन भरात आले होते. त्यामुळे पॉयटर हे त्या आंदोलनाचे अग्रदूत बनले. पॉयटकर यांच्या भूमिका नेहमीच शांततामय बदल घडवून आणणाऱ्या सुधारकाच्या असायच्या. सातत्याने होणारा छळ आणि दमन सहन करायला लागल्यामुळे मनात खदखदत असलेला असंतोष व्यक्त करण्याचे संयत मार्ग पॉयटर यांच्या भूमिकांमधून सामान्य माणसापुढे मांडले जात असत, ही पॉयटर यांच्या कारकिर्दीची खासियत म्हणावी लागेल.