मुंबई – सध्या महाराष्ट्रात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोविड बरोबरच डेल्टा, ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने फैलावत असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत सुत्रा कार्नोसियम संस्थेने कोविड संसर्गासंदर्भात तयार केलेला अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
राज्यातील ओमायक्रॉनच्या परिस्थितीबाबतचे सुत्रा कार्नोसियम संस्थेने ऑनलाइन सादरीकरण केले. सादरीकरणात कोविड विषाणूंबाबत आतापर्यंत केलेला अभ्यास प्रामुख्याने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, संशोधन यावेळी सादर केले.
सध्या तरी राज्य शासन, केंद्र शासन आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी कोविडसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आहे. 15 जानेवारी रोजी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत असल्याने राज्य शासन कोविड संदर्भातील परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
संबंधित संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून कोविड बाबत केलेल्या अभ्यासासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला तातडीने सादर करावा. विद्यापीठाने हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवावा, त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या अहवालाचा अभ्यास करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी निर्देश दिले.