नवी दिल्ली – हॉकी इंडियातर्फे आयोजित येत्या रविवारपासून सुरू होणार असलेले भारतीय हॉकी संघाचे सराव शिबिरही स्थगित करण्यात आले आहे. करोनाचा धोका वाढल्याने बेंगळुरू येथे होणारे हे शिबिर आता अनिश्चित कालावधीसाठी स्थगित झाले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) हॉकी इंडियाच्या परवानगीने या शिबिराचे आयोजन केले होते. आता शहरात करोनाचा धोका गेल्या दोन दिवसांपासून वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. साईच्या निवासी शिबिरात अनेक खेळाडू राहात होते. त्यांनाही घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिबिराच्या नव्या तारखा जाहीर झाल्यावर या खेळाडूंना पुन्हा बोलावण्यात येणार असल्याचे साईकडून सांगण्यात आले आहे.