कराड – शंभर वर्षे एखादी शिक्षण संस्था कार्यरत राहणे सोपी गोष्ट नाही. शिक्षण मंडळ कराड या संस्थेची व टिळक हायस्कूलची केवळ वाटचाल सुरु नाही; तर भरभराट सुरु असल्याचा सार्थ अभिमान आहे. मी देशात कुठेही शिकलो, तरी मी ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिकलो; ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा माझ्या कायम स्मरणात आहे. शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री देण्याचा इतिहास घडविला आहे, ही महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ व पहिलीच घटना आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.
येथील शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभास सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हा. चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, चंद्रशेखर देशपांडे, राजेंद्र लाटकर, डॉ. अनिल हुद्देदार, सपोनि सरोजिनी पाटील, उदय थोरात, ऍड. विक्रम कुलकर्णी, ऍड. सदानंद चिंगळे, सुधीर घाटे, मुख्याध्यापक जी. जी. अहिरे, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, शिक्षण संस्था आदर्श कशी असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण मंडळ आहे. देशप्रेमाचे धडे देणारी व राष्ट्रीय शिक्षणाचा पाया असणाऱ्या टिळक हायस्कूलमध्ये मी शिकलो याचा मला अभिमान वाटतो. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, कोल्हटकर असे शेकडो विद्यार्थी देशाच्या उभारणीत संस्थेने व शाळेने दिले आहेत. संस्थेने सर्वच शाखांच्या माध्यमातून उच्च गुणवत्ता जोपासली आहे, म्हणून आज संस्थेचे महाराष्ट्रात आदराने नाव घेतले जाते. देशविदेशात असणाऱ्या पंधरा हजार माजी विद्यार्थ्यांचा डेटाबेस एकत्र करण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्थेने केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी व शाळेच्या मदतीसाठी पुढे येवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, टिळक हायस्कूलने देशाच्या जडणघडणीत अनेक नेतृत्ववान विद्यार्थी दिले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक उच्च पदांवरती कार्यरत असताना विकासकामांची गती वाढविली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वेळी संस्थेला भरभरुन मदत केली आहे. याहीपुढे मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. स्वागत बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रशेखर देशपांडे, अनघा परांडकर यांनी केले. बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक चंद्रशेखर देशपांडे, सूत्रसंचालन उपशिक्षक भरत कदम, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांनी आभार मानले.