मुंबई – एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन केले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री असे नवीन समीकरण देखील राज्याने पाहिले. त्यानंतर आता पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर दिसणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. निमित्त आहे वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे.
पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यानिमित्त दरवर्षी निमंत्रित केलं जात आणि त्यांच्याच हस्ते यावेळी अनेकांचा गौरव देखील केला जातो. त्यामुळे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पवार शिंदे यांच्यात दोनदा भेट झाली आहे. मात्र वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरीओ लावली तर ते नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.