हिंजवडी -आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना संधी दिली जाईल. निवडणुकांच्या युती अथवा आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी व सरकारमधील घटकपक्ष घेतील तेव्हा घेतील. परंतु राष्ट्रवादीची विचारधारा घेऊन तरूणांनी कामाला लागा, अशा सूचना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हिंजवडी पंचायत समिती गणाच्या आढावा सभेत ते मारुंजी येथे बोलत होते.
या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे, युवा नेते सुरेश हुलावळे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, सागर साखरे, मल्हारी साखरे, गणेश गायकवाड, दत्तात्रय जाधव, गणपत जगताप, सुभाष बुचडे, सुहास दगडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत हगवणे यांनी जिल्हा बॅंकेचे संचालक आत्माराम कलाटे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांच्याशीच त्यांनी प्रतारणा केली. अशा निष्क्रीय, वयस्कर व दलबदलू बॅंक संचालकांना मतदारांनी सक्तीची विश्रांती द्यावी, असे आवाहनही हगवणे यांनी केले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन रामदास पायगुडे यांनी केले. समीर बुचडे यांनी आभार मानले.
=================