हिंगोली – कन्याकुमारी भोसले व तिच्या दोन मैत्रिणी चोंढी फाटा ते औंढा मार्गावर धावण्याचा सराव करत होत्या. यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला धडक दिली. या अपघातामध्ये कन्याकुमारी १० ते १२ फूट उंच उडून खाली पडली अन् तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २ मार्च) रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. कन्याकुमारी कृष्णा भोसले (वय १९ वर्ष, आंबा, ता. वसमत) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील आंबा येथील कन्याकुमारी भोसले व तिच्या दोन मैत्रिणी चोंढी फाटा ते औंढा मार्गावर धावण्याचा सराव करीत होत्या. यावेळी दोन मैत्रिणी पुढे धावत होत्या तर कन्याकुमारी मागे होती. यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे ती सुमारे १० ते १२ फुट उंच उडाली अन् रस्त्यावर कोसळली. या अपघातानंतर कार चालकाने कार थांबवून तिला पाहिले, मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कारसह पलायन केले. सदर प्रकार परिसरातील आखाड्यावर असलेल्या एका शेतकऱ्याने पाहिला. त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
समोर धावणाऱ्या मैत्रिणींना जोरात ओरडल्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी मागे पाहिले असता कन्याकुमारी रस्त्यावर पडलेली दिसून आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, विनायक जानकर, ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कन्याकुमारी यांचा मृतदेह वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.