तळमावले – पाटण तालुक्यात अतिशय संघर्षमय झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत हिंदुराव पाटील यांनी दिलेली झुंज कौतुकास्पद असून पडत्या काळात त्यांनी कॉंग्रेस पक्षाला दिलेली साथ विसरून चालणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
मंदुळकोळे खुर्द व मंदुळकोळे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, पाटण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक आत्माराम कदम, मंदुळकोळे सोसायटीचे उपाध्यक्ष दादासो साळुंखे, माजी सरपंच तुकाराम पाटील, माजी उपसरपंच अरविंद कुंभार, नवनिर्वाचित सरपंच उमादेवी भोई, सदस्य संजय लोहार, बाळासाहेब रोडे, सतिश कदम, विनया पाटील, कमल पाटील, सुनिता साबळे, सारिका काटकर, नथुराम सुतार, सुभाष ढेब, सुनंदा पवार उपस्थित होत्या. श्री. चव्हाण म्हणाले, हिंदुराव पाटील यांनी पक्षाने जी जबाबदारी दिली, ती त्यांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष त्यांच्या कामाची पोचपावती देईल.
हिंदुराव पाटील म्हणाले, तालुक्यात पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. पक्षाचा जो आदेश येईल, त्याप्रमाणे शेवटपर्यंत पक्षासाठीच काम करणार असून, सत्तेत असो अथवा नसो सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी लढत राहणार आहे. दरम्यान, अभिजीत पाटील यांनी तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली.