ग्वाल्हेर – महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्या विषयीची खरी माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय हिंदु महासभेच्यावतीने 14 मार्च रोजी ग्वाल्हेर ते दिल्ली अशी मोटार रॅली काढली जाणार आहे. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी ही माहिती दिली.
जानेवारी महिन्यात या संघटनेने आपल्या मध्यप्रदेशातील कार्यालयात गोडसेंच्या नावाने एक अभ्यास केंद्र स्थापन केले होते. पण जिल्हा प्रशासनाने त्यात हस्तक्षेप करून हे केंद्र बंद करण्यास भाग पाडण्यात आले होते. आता गोडसेंच्या उदात्तीकरणासाठी एक स्वतंत्र रॅलीच आयोजित करण्याची योजना या संघटनेने आखली आहे.
विशेष म्हणजे संघटनेचे काहीं पदाधिकारी 15 मार्च रोजी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. फाळणीच्या काळात देशातील हिंदुंवर झालेल्या अन्यायाची माहिती नवीन पिढीला करून देण्यासाठी संघटनेने आता व्यापक प्रयत्न हाती घेतले आहेत असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.