लॉकडाऊनमुळे सर्वांनीच घरातच बसून रहावे, हा संदेश आतापर्यंत सर्व अभिनेत्यांनी दिला आहे. आता हाच संदेश देण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी एक शॉर्टफिल्म केली आहे. “फॅमिली’ असे या शॉर्टफिल्मचे नाव आहे. त्यात अमिताभ बच्चन स्वतःच्या हरवलेल्या काळ्या चष्म्याचा शोध घेताना दिसतात. हा चष्मा शोधण्यासाठी दलजीत दोसांज, रणबीर कपूर, मामुट्टी, रजनीकांत, चिरंजीवी, आलिया भट आदी मंडळी एकमेकांचा विचारणा करत आहेत.
थोड्यावेळाने आलियाकडे चष्मा सापडतो. तो का शोधत होता, असे विचारल्यावर बच्चन म्हणतात, “विशेष काही नाही. सध्या तर मी कोठे बाहेर जातच नाही. पण बाहेर जाताना हा चष्मा घालत असतो. तेंव्हा सापडला नाही, तर उगाचच शोधाशोध नको. म्हणून मला तो हवा होता.’ हे उत्तर ऐकल्यावर सगळेच जण कपाळावर हात मारून घेतात. हा व्हिडीओ बनवताना सगळेच कलाकार एका घरात एकत्र आलेले नव्हते. तर सगळ्यांनी आपापल्या घरातून शुटिंग करून पाठवले होते, असे बच्चन यांनी नंतर सांगितले. त्याबरोबर प्रेक्षकांनीही आपल्या घरातून बाहेर जाऊ नये, असे आवाहनही करतात. बॉलिवूडच्या तंत्रज्ञ, सहकलाकारांसाठी मदतीचे आवाहनही त्यांनी या शॉर्टफिल्मद्वारे केले आहे.