हिंदी भाषा लादण्याला दक्षिणेकडील पक्षांचा विरोध

शहा यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर स्वीकारला आक्रमक पवित्रा

बंगळूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे हिंदी दिवसाला शनिवारी राजकीय वळण मिळाले. देशाची समान भाषा बनण्याची पात्रता हिंदीमध्ये आहे, अशा आशयाचे प्रतिपादन शहा यांनी केले. त्याला दक्षिणेकडील राज्यांमधील पक्षांनी आक्षेप घेतला. हिंदी भाषा लादण्याला आम्ही विरोध करू, असा आक्रमक पवित्रा त्या पक्षांनी स्वीकारला.

कर्नाटकमधील जेडीएस आणि कॉंग्रेस तसेच तामीळनाडूतील अण्णाद्रमुक आणि द्रमुक या पक्षांनी शहा यांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा खोटारडेपणा थांबवावा. कन्नडप्रमाणेच हिंदीही देशातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. खोट्या माहितीच्या आधारे कुठल्या भाषेचा प्रसार होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी दिली. हिंदीला आमचा विरोध नाही.

मात्र, ती लादण्याच्या प्रयत्नांना विरोध आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कर्नाटकचे आणखी एक माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. हिंदीप्रमाणेच कन्नड हीसुद्धा अधिकृत भाषा आहे. त्यामुळे कन्नड दिवस कधी साजरा करणार ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावे, असे ट्‌विट त्यांनी केले.

तामीळनाडूतील सत्तारूढ पक्ष असणाऱ्या अण्णाद्रमुकने हिंदी भाषेवरून केंद्र सरकारला सावध करण्याचा प्रयत्न केला. एकतर्फीपणे हिंदी लादली गेल्यास पाठिंबा मिळणार नाहीच; उलट प्रतिकूल पडसाद उमटतील. तामिळनाडूबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, बंगालमधून विरोधी सूर उमटतील, असे अण्णाद्रमुकने म्हटले. तर तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकने शहा यांची भूमिका धक्‍कादायक असल्याचे म्हटले. राष्ट्रीय अखंडत्वावर घाला घालणारी भूमिका शहांनी मागे घ्यावी, अशी मागणी त्या पक्षाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.