बलुच कार्यकर्त्यांनी जीनिव्हात झळकावले पाकिस्तानविरोधी पोस्टर्स

मानवाधिकार भंगाकडे वेधले लक्ष

जीनिव्हा – बलुच कार्यकर्त्यांनी जीनिव्हात पाकिस्तानविरोधी पोस्टर्स अभियान हाती घेतले आहे. त्यातून पाकिस्तानकडून स्वत:च्याच बलुचिस्तान प्रांतात मोठ्या प्रमाणात मानवाधिकार भंग सुरू असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

जीनिव्हात सध्या संयुक्‍त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेचे सत्र सुरू आहे. त्या परिषदेत पाकिस्तानने काश्‍मीरवरून रडगाणे गात भारतविरोधी कांगावा केला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानची बोलती बंद केली. आता बलुच कार्यकर्त्यांच्या पोस्टर्स अभियानामुळे पाकिस्तानला घरचा आहेर मिळाला आहे. त्या अभियानामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे. बलुचिस्तानातील अत्याचारांबद्दल पाकिस्तानवर जागतिक स्वरूपाची कारवाई व्हावी, अशी मागणी संबंधित पोस्टर्समधून करण्यात आली आहे.

पोस्टर्स अभियानाला बलुच हत्याकांड थांबवावे असे नाव देण्यात आले आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वांत वंचित प्रांत आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडॉरच्या नावाखाली बलुचिस्तानमध्ये उच्छाद सुरू आहे. चीनी वसाहतींसाठी जागा करून देण्यासाठी बलुचांची घरे उद्धवस्त केली जात आहेत.

बलुच महिला आणि बालकांच्या अपहरणाच्या घटना सातत्याने घडतात, असा दावा बलुच कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. बलुचिस्तानमधील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानवर दबाव टाकावा आणि त्या देशावर निर्बंध घालावेत, अशी मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.