नाशिक – आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. तृप्ती जगदाळे या महिलेने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळासाठी पाईपवरुन चौथ्या मजल्यावर पोहोचल्याची घटना घडली आहे. त्याचं घडलं असं की, 22 मे रोजी तृप्ती या कचरा टाकण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजातून गॅलरीत गेल्या होत्या. यावेळी त्यांचे दीड महिन्याचे बाळ ‘मल्हार’ घरातच झोपले होते. मात्र अचानक मागच्या दरवाजातून हवा आल्याने मुख्य दरवाजा बंद झाला, त्यावेळी तृप्ती या घराच्या बाहेर होत्या. पण बाळ घरात एकटेच होते. त्यामुळे त्यांना चिंता वाटू लागली.
नाशिकच्या पेठरोड भागातील अष्टविनायक नगर येथील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. बाळाची आई आणि बाळ दोघेचं घरात होते. हवेमुळे अचानक दरवाजा बंद झाला. त्यानंतर त्यांनी शेजारच्या घरातून मागच्या गॅलरीत जाऊन तिथून पाईपच्या साहाय्याने चढून स्वतःच्या घरात प्रवेश केला. सध्या त्यांच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.
तृप्ती यांच्या घरातील सर्व बाहेर गावी गेल्याने त्यांना यायला उशीर होणार होता. तसेच मोबाइल देखील घरातच असल्याने कोणाशी संपर्क साधता येत नव्हता. त्यांच्या पुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.मात्र बाळ रडत असल्याने त्यांनी केवळ बाळाचा विचार करत पाईपवरून घराकडे धाव घेतली.
त्यानंतर त्या घरच्या मागच्या दारानं त्या खोलीत पोहोचल्या आणि बाळाला घेतले. त्यांना कोणत्याही परिस्थितीत बाळापर्यंत पोहायचे होते. म्हणून त्यांनी हे मोठे धाडस केले. या घटनेनंतर तृप्ती यांचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे. या मातेचे हे धाडस ऐकल्यानंतर इतिहासात वाचलेल्या हिरकणीची गोष्ट नक्कीच आठवते.