पिंपरी -जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेडसेपरेटरमध्ये मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहनांकरिता हा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे नाशिक फाट्यावरुनच वाहतूक महामार्गावरुन वळविण्यात आली होती. परिणामी याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
मेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांशी काम पूर्ण झाले असून, मेट्रोची ट्रायल रनदेखील घेण्यात आली आहे. मात्र अद्यापही किरकोळ कामे बाकी आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी मेट्रोच्या वतीने वाहतुकीत बदल केला जात असतो.
त्यानुसार शुक्रवारी (दि.17) ग्रेडसेपरेटरमधील कामासाठी या मार्गावरील वाहतुकीमध्ये काही वेळ बदल करण्यात आला होता. त्यामुळे दापोडीकडून निगडीच्या दिशेने जाणारी वाहने तसेच नाशिक फाट्याकडून निगडीकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे वाहतूक दिव्यांकडे दुर्लक्ष करून, वाहने दामटली जात असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.