हरारे – सिन विल्यम्सने फटकावलेल्या दमदार दीडशतकी खेळीच्या जोरावर यजमान झिम्बाब्वे विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील लढतीत अमेरिकेचा तब्बल 304 धावांनी पराभव केला.
पहिल्यांदा खेळताना झिम्बाब्वेने मर्यादीत 50 षटकांत धडाकेबाज फलंदाजीचे दर्शन घडवताना केवळ 6 गड्यांच्या मोबदल्यात 408 धावांचा डोंगर उभारला. त्यात विल्यम्सने 101 चेंडूत तब्बल 21 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 174 धावांची अफलातून खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना जोयलार्ड गुम्बीने 103 चंडूत 5 चौकारांसह 78 धावांची खेळी केली.
सिकंदर रझाने 27 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह 48 तर, रायन बर्लने अवघ्या 16 चेंडूत 3 चौकार व 4 षटकार फटकावताना 47 धावा केल्या. अमेरिकेकडून अभिषेक पराडकरने 3 तर, जेस्सी सिंगने 2 गडी बाद केले.
विजयासाठी 409 धावांचा पाठलाग करताना अमेरिकेचा डाव 26 व्या षटकांत 104 धावांवर संपला. गोलंदाजीत चमक दाखवलेल्या पराडकरने फलंदाजीतही थोडीफार जिद्द दाखवताना 24 धावा केल्या. तसेच जसदीप सिंगने 21 तर, गजानंद सिंगने 13 धावा केल्या. या व्यतरीक्त त्यांचा एकही फलंदाज दोनअंकी धावा करू शकला नाही.
झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा व रिचर्ड गरावा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. ब्रॅड इव्हान्स, ल्युक जोंग्वे व रायन बर्ल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.