पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती (एक्सप्रेस) महामार्गावर ठिकठिकाणी स्पीडगन लावण्यात आल्यानंतरही वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांना चाप बसलेला नाही. एक्सप्रेस-वे वर हलक्या वाहनांसाठी ताशी 100 कि.मी. तर अवजड वाहनांसाठी ताशी 80 कि.मी. अशी वेग मर्यादा असताना वाहन चालक वेगाने वाहन चालवित असल्याचे स्पीडगनमधील नोंदीतून निदर्शनास आले आहे. मागील पाच महिन्यांत घेण्यात आलेल्या नोंदीवरून पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वर सर्वाधिक ताशी 180 कि.मी. त्यानंतर ताशी 160 कि.मी. आणि ताशी 142 कि.मी. अशी नोंद घेण्यात आली असल्याचे आरटीओने आपल्या नोंदीत म्हटले आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वर वेगाने वाहन चालविणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पुणे तसेच पिंपरी-चिंचवड आरटीओकडून दि. 1 डिसेंबर 2022 पासून या महामार्गावर ठिकठिकाणी स्पीडगन लावण्यात आल्या. त्यानुसार एप्रिल 2023 या पाच महिन्यांत पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वर सर्वाधिक ताशी 180 कि.मी. इतकी नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे सर्वाधिक “स्पीड’ असलेल्या गाड्या या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांना ऑनलाइन पद्धतीने दंड पाठविण्यात आला आहे. यापुढेही ही मोहीम अशीच सुरू राहणार असून प्रत्येक गाडीच्या वेगावर स्पीडगनची नजर असणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबई-पुणे द्रुतगतीवर वाहन चालवताना वेग मर्यादा पाळणे महत्वाचे आहे. आरटीओची करडी नजर आणि दंडात्मक कारवाई सुरू राहणार असून ही मोहीम मे 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. वाहन चालकांमध्ये सुधारणा व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई प्रादेशिक परिवहन अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी डोळ्यांत तेल घालून वाहन चालकांवर लक्ष ठेवून आहेत. – अतुल आदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
वाहनांवरील कारवाई
(गेल्या पाच महिन्यांतील आकडेवारी)
ओव्हरस्पीड 2682
लेन कटिंग 1556
विदाउट सीट बेल्ट 2128
रॉंगसाइड पार्किंग 347