पुणे – शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर अखेर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बुधवारी दिवसभरात 21 अनधिकृत होर्डीग्ज काढण्यात आले. या कारवाईसाठी महापालिकेने स्वतंत्र पथके नेमली असून ही कारवाई या पुढेही कायम ठेवली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
शहरात सुमारे 1600 अनधिकृत होर्डिंग्ज असून प्रामुख्याने ती नव्याने समाविष्ट गावांमध्ये आहेत. या गावातील होर्डिंग्जला अधिकृत करण्यासाठी अभय योजना प्रस्तावित आहे. मात्र, त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच अनेक होर्डिंग्जचे मालकच सापडत नसल्याने असे होर्डिंग्ज काढण्यासाठी पालिका सरसावली आहे. बुधवारपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिकेकडून रेल्वे स्टेशनच्या हद्दीत असलेल्या होर्डिंग्जलाही नोटीस बजाविली असून 24 तासांच्या आत ते हटविले नाही तर कारवाई करणार असल्याचे उपायुक्त जगताप यांनी स्पष्ट केले.
दि. 5 ऑक्टोबर 2018 मध्ये रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्ज काढताना त्याचा सांगाडा चौकात थांबलेल्या वाहनांवर पडला होता. त्यानंतर पालिकेने सातत्याने रेल्वे प्रशासनाला नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रतिसाद देत नसल्याने महापालिकेने रेल्वेचे बोर्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे.