पुणे – शहरातील करोना परिस्थिती चिंताजनक झाली असून, गेल्या 24 तासांत 2587 बाधितांची नोंद झाली आहे. यातील 2014 बाधितांची नोंद महापालिकेच्या स्वॅब सेंटरवरील असून, उर्वरित 573 अहवाल हे मंगळवारी खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेल्यांचे आहेत.
गेल्या वर्षी नऊ मार्चला पहिला रुग्ण आढळल्यानंतर 16 सप्टेंबर म्हणजे तब्बल सहा महिन्यानंतर बाधितांची संख्या दोन हजार पार झाली होती. 16 सप्टेंबर रोजी बाधितांची संख्या 2 हजार 120 होती. मात्र, आता 15 फेब्रुवारी ते 17 मार्च या एक महिन्याच्याच कालावधीत बाधितांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली असून, आता नागरिकांच्या चलनवलनावर निर्बंध येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बाधित मृतांची संख्याही दिवसभरात 16 असून त्यातील पाच बाधित पुण्याबाहेरील आहेत. यांसह मृतांची संख्या आता 4 हजार 980 झाली आहे. आजपर्यंत झालेल्या 12 लाख 74 हजार 926 संशयितांच्या स्वॅब चाचण्यांतील 2 लाख 23 हजार 797 जण बाधित आढळले आहेत. त्यातील 2 लाख 3 हजार 785 जण बरेही झाले आहेत.
मात्र 15 फेब्रुवारीपासून बाधितांचीच संख्या वाढत चालल्याने बाधित आणि बरे होणारे यांचे प्रमाणही व्यस्त होत चालले आहे. त्यामुळे “रिकव्हरी रेट’ कमी दिसत आहे. दिवसभरात 769 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाधितांमधील ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 15 हजार 32 असून, त्यात 425 रुग्ण गंभीर आहेत तर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढली असून ती 805 आहे. मागीलवर्षी 16 सप्टेंबर रोजीची ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 17 हजार 672 होती.
स्वॅब टेस्टही विक्रमी
यावर्षी बाधितांची आकडेवारी रेकॉर्ड ब्रेक झाली असताना स्वॅब टेस्टही “रेकॉर्ड ब्रेक’ झाले आहे. दिवसभरात 11 हजार 230 स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यातील “आरटीपीसीआर’ टेस्टचा अहवाल शुक्रवारपर्यंत अपेक्षित आहे. त्यावेळी बाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.