मुंबई – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिलला मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.
या निवडणुकीसाठी भाजप पक्षाने कंबरकसली असून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगांव आणि मंगळवेढा शहरात येथे सभा घेतल्या या सभांदरम्यान त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली.
“लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी महाविसार आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.
दरम्यान, सरकार पाडण्याची गर्जना करणाऱ्या फडणवीसांना सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांनी गाण्यातून जोरदार टोला लगावला आहे. “हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय..’ अश्या शब्दात आनंद शिंदे यांनी टीका केली.
काय होत्या आनंद शिंदे यांच्या या गाण्याच्या ओळी…
तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय…
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय…
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय…
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय…