#प्रभात_दीपोत्सव_२०२० : खाण्यासाठी जगणारा बबन्या

– किरण बेरड


बबन्याची आई लहानपणीच सोडून गेल्यामुळे त्याचे खाण्यापिण्याचे हालच झाले. बापाच्या हातच्या त्रिकोणी, कधी चौकोनी भाकरी खातच बबन्या लहानाचा मोठा झाला. बापाने केलेला स्वयंपाक खाणं हे त्याच्यासाठी दिव्यच असायचं. भाजी तर भिंग लावूनसुद्धा कळत नसायची, नेमकी कशाची आहे. सगळ्या भाज्यांची एकच चव. कारण कोणतीही भाजी कशातही मिक्‍स केलेली असायची. बरं सकाळच्या भाकरी जर शिल्लक राहिल्या, तर वडील रात्रीच्या जेवणाला रितसर बगल द्यायचे. त्यामुळे लोखंडासमान कडक झालेल्या भाकरी भिजवून खाव्यात, कापून खाव्यात, तोडून खाव्यात की खलबत्त्यात ठेचून खाव्यात, या विचारातच बबन्याची रात्र सरायची आणि तृप्तीच्या ढेकराऐवजी पोकळीचा ढेकर यायचा. 

अशावेळी जर गावात कुणाच्या घरी काही कार्य असेल, तर बबन्या तिथं वेळेच्या अगोदर हजर असायचा. आपल्याला कुणी बोलावलं नाही, याचा राग त्याला आयुष्यात कधीच आला नाही. आमंत्रण नावाची गोष्ट असते, हेच मुळी त्याला माहीत नव्हतं. लोकांना निरोप सांगण्यापासून तर त्याच लोकांनी खरकटे केलेली भांडी धुण्यापर्यंत असलेली महत्त्वाची जबाबदारी बबन्या लीलया पार पाडत असे. बरं याच्या बदल्यात त्याला मिळायचं काय, तर दोन वेळचं जेवण. कधी कुणी उरलं म्हणून बांधून दिलं, तर बबन्या त्याला “बोनस’ समजायचा.

थोडं मोठं झाल्यावर बबन्या स्वत:च्या हाताने स्वयंपाक नामक अवघड गोष्ट करायला शिकला. पण म्हणतात ना शिकवणाराच जर अडाणी असेल, तर शिकणारा कसा सुशिक्षित होणार. शेवटी बबन्या बापाची झेरॉक्‍स कॉपी बनला आणि बेचव जेवणाची परंपरा तशीच पुढे चालू राहिली. आपण एवढा मन लावून स्वयंपाक करतोय, तरी लोकांसारखा तो चविष्ट का होत नाही, याचं उत्तर त्याला लग्न होईपर्यंत मिळालं नाही.

त्या काळात मोबाइल वगैरे काही नव्हतं. त्यामुळे जर कुणाला बबन्याची गरज पडली तर ते त्याला घरी शोधण्यापेक्षा गावात कुणाच्या घरी कार्यक्रम आहे का, हे अगोदर शोधत असत. बबन्या नेमका तिथंच सापडायचा. त्या काळात कुणी मूलबाळं व्हावं म्हणून देवाकडे नवस करायचे, तर कुणी सरकारी नोकरी मिळावी म्हणून, कुणाचं डॉक्‍टर बनण्याचं स्वप्न राहायचं, तर कुणाचं इंजिनिअर. पण आपल्या या बबन्याची देवाकडे एकच प्रार्थना असायची, ती म्हणजे देवा, गावात रोज कुणाच्या ना कुणाच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असू दे. नाही रोज लग्न लागले तरी मुंज, दहावा, तेरावा का होईना कुणाचा तरी असावा, असं बबन्याला रोज वाटे.

गावचा हरिनाम सप्ताह म्हणजे बबन्याचं होम पिच. इथे त्याला मनमोकळी बॅटिंग करण्याची संधी मिळत असे. अनभिषिक्त सम्राटासारखा तो इथे वावरत असायचा. उरलेली लापशी कुणाच्या घरी किती पाठवायची, याचे अधिकार त्याला गावाने बहाल केले होते.

एकंदरीत बबन्याचे हे जेवणाचे हाल पाहून गावातील एका सद्‌गृहस्थाने बबन्यासाठी एक मुलगी पाहिली. बबन्याच्या मनात लाडू फुटायला लागले. कारण त्याला आता रोज चांगले जेवायला मिळेल, अशी वेडी, भोळीभाबडी आशा वाटत होती. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला. बबन्या पहाटेच उठून गरम तांब्याने कपड्यांना इस्त्री करून तयार झाला. दुपारी पाहुण्यांच्या घरी साग्रसंगीत जेवण असणार आणि ते खास आपल्यासाठी बनवलेलं असणार, या कल्पनेनंच त्याला रोमांचित करून सोडले. बाकीच्या उपवर मुलांच्या डोक्‍यात मुलगी पाहायला जाताना विचार असतात की मुलगी कशी असेल? मोकळे केस सोडलेले असतील की वेणी घालत असेल?

सडपातळ असेल की दुहेरी हाडाची असेल? नाक चाफेकळी असेल की म्हशीने पाय दिल्यासारखं बसकं असेल? स्माइल दीपिका सारखी असेल की कॅटरिना सारखी असेल? असे अनेक प्रश्‍न मोहोळाच्या माशा उठाव्यात, असे उठत असतात. पण आपल्या बबन्याची बातच न्यारी होती. त्याच्या डोक्‍यात विचार सुरू होते की, पाहुण्यांनी नेमकं काय केलं असेल बरं जेवायला? पुरण-पोळी असेल की पुरी-भाजी असेल? जर पुरी-भाजी असेल, तर भाजी बटाट्याची असेल की मटकीची असेल? सोबत श्रीखंड असेल की शिरा असेल? शिऱ्यामध्ये डालडा घातलेला असेल की गावरान तूप घातलं असेल? त्यात बदाम-काजूचे तुकडे असतील का? भजे कोणते असतील? पालक भज्याऐवजी बटाटा भजे असतील तर जाम मजा येईल, असे विचार त्याच्या तोंडाला पाणी सोडत होते.

त्या दिवशी बबन्या मध्यस्थांची वाट पाहत सकाळपासून अंगणातच बसून होता. वडिलांनी रात्रीच्या उरलेल्या शिळ्या भाकरीचा तिखट मीठ टाकून केलेला चुरा खाण्यासाठी त्याला दोनदा हाक मारली. पण आता जर नाश्‍ता केला, तर दुपारी जेवण कमी जाईल, म्हणून बबनरावांनी मोठ्या मनाने नाश्‍ता नाकारला. दातांचं पाणी गिळत असतानाच मध्यस्थ मोटारसायकल घेऊन आले आणि बबन्याचा जीव भांड्यात पडला. दोघंही मोटारसायकलीवर बसून निघाले.

पाहुणे त्यांची वाट पाहतच होते. त्यांची गाडी पाहुण्यांच्या दारात थांबली. बबनराव खाली उतरले. घरातील गडीमाणसे व्हरांड्यात उभे राहून, तर बाईमाणसं खिडकीच्या फटीतून, दरवाजाच्या मागून जिथून जागा मिळेल तेथून नवरदेव कसा दिसतो, ते पाहू लागले. बबनरावांनी गाडीच्या खाली उतरल्याबरोबर पाहुण्यांना राम राम घालण्याच्या अगोदर स्वयंपाक काय असेल, याची चाचपणी घ्यायला नाकाने सुरुवात केली.

पाहुणे राम राम करत आहे आणि आपला बबन्या इकडे भिरभिर नजरेने पाहत आहे. मध्यस्थींच्या लक्षात याची अडचण झाली. कार्यक्रमाची सर्व सूत्रे त्यांनी हातात घेतली आणि ते स्वत: सर्वांशी गप्पा मारू लागले. बबन अस्वस्थ होऊन जेवण कधी मिळेल, याची वाट पाहू लागला. त्याची अस्वस्थता उपस्थित लोकांच्या नजरेतून सुटली नाही. पण झालं उलटं. त्यांना वाटलं की हा मुलीला पाहण्यासाठीच बेचैन झाला आहे. त्यामुळे त्यांनी जेवणाच्या अगोदर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे ओपनिंगला बॅटिंग असण्याऱ्या बॅट्‌समनला सातव्या क्रमांकावर बॅटिंग कर असं म्हणल्यावर जसा चेहरा होईल, तसा चेहरा आपल्या बबनरावांचा झाला. पण इलाज नव्हता. भूक तर लागली होती.

मधोमध सतरंजी अंथरली गेली. त्यावर प्रश्‍न विचारण्यासाठी मध्यस्थी बसले. बबनकडे नारळ आणि खडीसाखर होती. मुलगी पावले चोरत-चोरत पदर डोक्‍यावर घेऊन आली आणि मध्यस्थांसमोर बसली. प्राथमिक प्रश्‍न-उत्तरांचा क्‍लास सुरू असतानाच बबनने खडीसाखरेच्या पुड्यातून पाच-सहा खडे अलगद काढून कुणी पाहत तर नाही ना, याची खातरजमा करून तोंड पुसण्याची ऍक्‍टिंग करत तोंडात ढकलले. बुडणाऱ्याला काठीचा आधार, या म्हणीप्रमाणे खडीसाखरेमुळे बबनला थोडे हायसे वाटले. तसेही बबनला मुलगी गोरी की काळी, हे पाहण्यात इंटरेस्ट नव्हताच. त्यामुळे तो मुलीकडे पाहणे टाळतच होता. स्वयंपाक घरातून येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा घमघमाट त्याच्या नाकातून जात नव्हता.

अचानक मुलीच्या बापाने विचारले, “बबनराव तुम्हाला काही प्रश्‍न मुलीला विचारायचे असतील, तर विचारा. यावर चटकन बबनराव म्हणाले, “”जेवायला काय काय आहे आज?” सगळे अवाक्‌ होऊन बबनरावकडे एकदा आणि एकमेकांकडे एकदा पाहू लागले. आता मध्यस्थींनाच सावरून घेणे भाग होते. ते लगेच म्हणाले, “”स्वयंपाकात काय काय येते मुलीला? असं बबनरावांना विचारायचं होतं.” आपण काय घोडचूक केली हे बबनरावांच्या लक्षात येऊन ते खजील होऊन खाली पाहू लागले.

मध्यस्थींच्या सावरासावरीमुळे पाहुण्यांचेही समाधान झाले. पण मुलीच्या वडिलांनी मध्यस्थींनी विचारलेल्या मुलीला स्वयंपाकात काय काय येतं? या प्रश्‍नाला जाणूनबुजून का बगल दिली, हे बबनरावला आणि मध्यस्थींना काही कळलं नाही. मुलगी उठून आत गेल्यानंतर पंगतीसाठी सतरंज्या अंथरल्या गेल्या आणि एवढा वेळ बबनराव ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण समीप आल्यामुळे बबनरावांची कळी खुलली. कुणी जेवायला बसा म्हणण्याच्या आत बबनराव एकटेच पटकन फतकलं मांडून बसले, हे पाहून मध्यस्थींनाच लाजल्यासारखे झाले.

पानं वाढली गेली. अगोदर मटकीची भाजी आली. नंतर शिरा आला. पुरी येण्यासाठी वेळ असतानाच बबनरावांनी शिऱ्याचा एक घास तोंडातही टाकून दिला. सगळ्यांनी हे पाहून न पाहिल्यासारखे हावभाव केले. ताटात पुरी आल्यानंतर मात्र बबनरावांनी कोण काय म्हणेल याचा विचारच सोडून दिला. बाकीच्यांना भजे, कुरडई पोहोचेपर्यंत याने दोन पुऱ्याही संपविल्या. पहिल्या दोन पुऱ्या आत जाण्याचा स्पीड पाहता मुलीच्या वडिलांनी पुऱ्यांचं घमेलंच बबनरावांपुढे आणून ठेवलं. सगळ्यांची जेवणं सुरू असतानाच मध्यस्थींनी बबनला विचारले, “”काय मग बबनराव कशी आहे मुलगी?” बबनराव पटकन म्हणाले “”चांगली आहे. फक्‍त अजून थोडे मोड यायला पाहिजे होते.” सर्व जण हातातला घास हातात ठेवून एकमेकांकडे टकामका पाहू लागले. मध्यस्थींनी खरकट हात तसाच कपाळावर मारून घेतला.
थोड्या वेळाने सगळ्यांच्या लक्षात आले की, बबनरावांचे ते उद्‌गार मुलीविषयी नसून मटकीच्या भाजी विषयी होते. बबनचे जेवणाविषयीचे प्रेम पाहून पाहुणे भरून पावले. थोड्याफार बोलाचालीनंतर एकदाचे लग्न ठरले. आपल्याला जीवनसाथी मिळाली, यापेक्षा आपल्याला खाऊ घालणारी मिळाली म्हणून बबनराव खुशीत होते.

लग्नाचा दिवस उजाडला. सकाळपासून लगबग सुरू झाली. आहेर मोडण्यापासून तर परण्या काढेपर्यंतच सकाळ संपली. बबन्या या गडबडीत नाश्‍ता करायला विसरला. मुलीच्या गावात पोहोचल्यावर बबन्याला नवे कपडे घालण्यासाठी आणि दर्शनासाठी मारुती मंदिरात आणलं गेलं आणि तेवढ्यात बबनरावांचा जेवणाचा टाइम झाला. लग्न लागण्यासाठी अजून दोन तासांचा अवकाश होता. लग्न लागल्यानंतरही नवरा-नवरी सगळ्यात उशिरा जेवत असतात, हे बबन्याला आठवलं. आता काय करायचं, या विचाराने बबन्या कासावीस झाला.

पुढे मिरवणूक निघाली पण बबन्याचं लक्ष नाचणाऱ्या पोरांकडे नव्हते. कुठे काही खायला मिळेल का, हेच त्याचे डोळे शोधू लागले. एका दुकानाच्या बाहेर कुरकुरे लटकवलेले त्याला दिसले. लहान मुलांप्रमाणे त्याच्या तोंडाला पाणी सुटले. पण गाडीच्या खाली उतरून कुरकुरे आणणे त्याला शक्‍य नव्हते. त्याने एक शक्‍कल केली. खुणेने फोटोग्राफरला जवळ बोलावले आणि त्याला म्हणाला, “”कुरकुरे खाताना जर माझा फोटो काढला तर भारी दिसेल ना?” फोटोग्राफरने काही सेकंद त्याच्याकडे पाहिले आणि कुठे नवरदेवाला नाराज करता? म्हणत कुरकुरेचा पुडा बबन्याच्या हातात देऊन फोटो काढण्यासाठी मागे सरकला. 

वळून डोळ्यांना कॅमेरा लावून पाहतो तर काय बबन्याने कुरकुरे ओंजळीत भरून तोंडात कोंबले होते. हे पाहून फोटोग्राफरने कपाळाला हात मारून घेतला. वरात मंडपाच्या गेटवर आली. स्वयंपाकाचा घमघमाट बबन्याला अस्वस्थ करू लागला. कुरकुरेने अगोदरच पोटात कालवा कालव केली होती. त्यात भर या सुवासाची पडली.

बबन्या वेडापिसा झाला. “बहारों फूल बरसाओ…’ सुरू व्हायचं आणि बबन्या गायक व्हायचं एकच झालं. नवरदेव रुसून गायब झाला. नवरदेव रुसला… सर्व मंडपात हलकल्लोळ माजला. मुलीचा बाप मंडपाच्या बांबूला डोकं आपटून घेऊ लागला. तेवढ्यात मध्यस्थी उठला आणि थेट स्वयपांक जिथं चालला होता तिथे पोहोचला तर पाहतो काय बबन्या तिथं दोन्ही हातात चार चार गुलाब जामून घेऊन नरड्यात सोडत होता. हा नजारा पाहून मध्यस्थी डोक्‍यावर हात मारून घेत कुणी पाहत नाही ना, हे पाहून बबन्याच्या हाताला पकडत फरफरफरत पुन्हा मंडपाच्या गेटकडे घेऊन गेले. कसेबसे लग्न लागले. घाई गडबडीत बबनरावांनी नवरीच्या गळ्यात हार घातला आणि पंगतीच्या दिशेने पळाले.

पंगती बसतच होत्या तेवढ्यात यांनी ही डाव साधला आणि नवरदेव असूनही पहिल्या पंगतीत जेवण्याची परंपरा अबाधित राहिली. नवरी बिचारी त्याचं जेवण होईपर्यंत ताटकळत उभी राहिली. भटजींनीही स्टेजवर सतरंजी अंथरून वामकुक्षी घेतली. फोटोग्राफरनेही नवरीच्या मैत्रिणींचे फोटो काढले. त्यानंतर बबनराव ढेकर देत ढेरीवरून हात फिरवत स्टेजवर पोहोचले आणि पुढील विधी पार पडले.

बबन्याच्या घरात बायको आली खरी, पण बबन्याच्या आयुष्यात मात्र फरपट सुरूच राहिली. कारण बबन्याच्या बायकोला भाजी-भाकरीच काय पण चहासुद्धा करता येत नव्हता. मुलगी पाहायला गेल्यावर मुलीला स्वयंपाक करता येतो का, या प्रश्‍नावर सासऱ्यांनी विषय का बदलला होता? हे बबन्याच्या लक्षात आले. पण आता काही उपयोग नव्हता. पदरात पडलं आणि पवित्र झालं, असं म्हणत आपल्याच नशिबात चांगलं खाणं नाही, अशी मनाची खोटी समजूत घालून बबन्या स्वत: नवनवीन पदार्थ शिकायला लागला. कारण स्वत:सारखं आयुष्य त्याला त्याच्या मुलाला जगू द्यायचं नव्हतं.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.