शिक्रापूर – श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 333वा बलिदान स्मरण दिन 1 एप्रिल रोजी होणार आहे. सकाळी मूक पदयात्रा, शासकीय पूजा, शासकीय सलामी, हेलीकॉप्टरमधून समाधीवर पुष्पवृष्टी, पुरस्कार वितरण, धर्मसभा, पालखी सोहळा यांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सरपंच सारिका अंकुश शिवले यांनी दिली.
छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या ठिकाणी शंभू छत्रपतींच्या 333वा बलिदान स्मरण दिनानिमित्त शंभूराजांची समाधी, कवी कलश, वीर शिवले यांच्या समाधीवर सकाळी सहा वाजता महाअभिषेक होणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने महिनाभर पाळण्यात येत असलेल्या बलिदानमासाची सांगता मूक पदयात्रेने सकाळी सात वाजता होणार असून
सकाळी साडेआठ वाजता शासकीय पूजा जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख व पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर धर्मवीर श्रीशंभुछत्रपती पुण्यस्मरण निमित्त हभप बाजीराव महाराज बांगर यांचे कीर्तन होईल.
राज्यभरातून आलेल्या दिंड्या व पालख्यांचे आगमन झाल्यानंतर साडेअकरा वाजता शंभू छत्रपतींची समाधी व पुर्णाकृती पुतळा यांवर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय सलामी व शिवकालीन शस्त्रांची सलामी देण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार ऍड. अशोक पवार यांसह आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी यावर्षीचा स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार आमदार अशोक पवार व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना देण्यात येणार आहे. तर सायंकाळी सात वाजता छावा या नाटकाचे सादरीकरण समाधीस्थळावर होणार आहे.
श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथील समाधीस्थळावर येणाऱ्या शिवभक्तांच्या व्यवस्थेची पाहणी पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव पवार, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे, माजी उपसरपंच रमाकांत शिवले, संतोष शिवले, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे, अनिल भंडारे, कृष्णा आरगडे, सचिन भंडारे, स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भंडारे यांसह आदींनी केली आहे.
वढूला तुकोबारायांच्या पालखीतील सर्व दिंड्या आणाव्यात
जगद्गुरू तुकोबाराय पालखी सोहळ्यास छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिले होते. त्यामुळे शंभूछत्रपतींच्या 333व्या बलिदान स्मरणदिनी नतमस्तक होण्यासाठी देहु संस्थानतर्फे जगद्गुरु पालखी सोहळ्यातील सर्व दिंडी चालकांनी त्यांच्या दिंड्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वढुला येणार राज्यभरातून शक्ती ज्योत
वढु बुद्रुक येथील शंभुराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र वढु बुद्रुक – तुळापूर, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान गोदाकाठ येथून पालखी, श्री शिरुर हवेली प्रासादिक दिंडीची संगमेश्वर ते वढु बुद्रुक पालखी, पुण्यातून हेडगेवार ज्योत, पालखी व राज्यभरातून असंख्य शंभुभक्त ज्योत घेऊन येणार आहेत.