पुणे-महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतींमध्ये उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे. महापालिकेचे सर्वाधिक रेकॉर्ड असलेल्या नगरसचिव विभागातच उंदरांनी उच्छाद घातला असून पालिकेचे महत्त्वाचे रेकॉर्डच त्यामुळे धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या इमारतीत लाखो रुपयांची वातानूकुलीत यंत्रणा बसविण्यात आली असून या यंत्रणेची विद्युत तारा उंदरांनी कुरतडल्या आहेत. त्यामुळे, आग लागण्याच्या भीतीने ऐन उन्हाळ्यात ही यंत्रणाच बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर ओढावली आहे. हे उंदीर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून आतापर्यंत आठ ते नऊ उंदीर पकडण्यात आले आहेत. मात्र, हा प्रकार पाहता शहरातील उंदीर, घुशींच्या नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या पालिकेवरच आता आपल्याच कार्यालयील उंदिर, घुशींचे नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे.
सात ते आठ उंदीरच पकडण्यात यश
नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांकडून भवन विभाग तसेच विद्युत विभागास कल्पनाही देण्यात आली असून आरोग्य विभागासही उंदरांबाबत कळविण्यात आले आहे. त्यानंतर नगरसचिव विभागात दोन ते तीन पिंजरे कर्मचाऱ्यांनीच बसविले असून आतापर्यंत सात ते आठ उंदीर पकडण्यात आले आहेत.
इमारतीला आगीचा धोका
या संपूर्ण इमारतीला सेंट्रल एसी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे आतमधील बाजूस एससीचे डक्ट असून प्रत्येक कार्यालयात लाखो रुपयांचे एसी बसविण्यात आलेले आहेत. नगरसचिव कार्यालयातही पाच ते सहा एसी आहेत. मात्र, एससीच्या आतमधील बाजूस असलेल्या विद्युत तारा उंदरांनी कुरतडलेल्या आहेत. परिणामी, या तारांमुळे शॉक सर्किटचा धोका निर्माण होऊन आग लागण्याची शक्यता असल्याने हे लाखो रुपयांचे एसी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
विस्तारीत इमारतीला उंदरांचा विळखा
महापालिकेची नव्याने बांधण्यात आलेली विस्तारीत इमारत उंदरांच्या विळख्यात सापडली आहे. या इमारतीत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासह नगरसचिव विभागाचे कार्यालय आहे. गेल्या काही दिवसांपासून उंदरांनी नगरसचिव विभागातील कार्यालयातील कागदपत्रे कुरतडली असून दिवसाही या उंदरांचा मोकाट वावर सुरूच आहे. नगरसचिव विभागात गेल्या पाच वर्षांतील सर्व महत्त्वाचे ठराव, कागदपत्रे, तसेच नगरसेवकांशी संबंधित कागदपत्रे आहेत. तर, याच इमारतीतील महापालिका पदाधिकाऱ्यांची कार्यालये असून ती पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने सील केली आहेत.