रांजणगाव – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसून भीषण अपघात झाला आहे. ही घटना पुणे-नगर मार्गावर कारेगाव येथे दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
सुदाम शंकर भोंडवे (वय 65), सिंधुबाई सुदाम भोंडवे (वय 55), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय 35), आनंदी अश्विन भोंडवे (वय अडीच वर्ष) अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे असून अश्विन सुदाम भोंडवे जखमी झाले आहेत. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन भोंडवे हे आपल्या कुटुंबासह बीड वरून चाकणकडे त्यांच्या पाहुण्याकडे जात असताना नगर-पुणे मार्गावर कारेगावच्या हद्दीतील फलकेमळा येथील एका हाॅटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या केटेनरला भोंडवे यांच्या कारची धडक बसली. कारचा वेग जास्त असल्याने भीषण अपघात झाला. दरम्यान अश्विन भोंडवे यांनी याबाबत कंटेनरचालकाविरुद्ध फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.