मुंबई – भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीच्या आणि दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, रायलसीमा, उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारादेखील देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
पश्चिम मध्य आणि नैऋत्य अरबी समुद्र; आग्नेय, पूर्व मध्य व ईशान्य अरबी समुद्र तसेच गुजरात-महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक-केरळ किनारपट्टीवर हवामानाची स्थिती वादळी राहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.