राज्यात उष्णतेची लाट; शुक्रवारपर्यंत कायम

पुणे – राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. ती शुक्रवारपर्यंत कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. त्याचबरोबर वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात काही ठिकाणी विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुद्धा अशाच प्रकारे महाराष्ट्र होरपळून गेला होता. त्यानंतर मे महिन्यात उन्हाळा थोडासा सुसह्य होईल, असे वाटत असताना पारा चाळीशी पार गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोकण वगळता सर्वत्र तापमानाचा पारा चढाच आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमान ब्रम्हपुरी येथे 45.9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याचबरोबर येत्या शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

पुणे शहरात तापमान 41 अंश नोंदविले गेले. हे सरासरीपेक्षा 4.6 अंशाने अधिक आहे. याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. दुपारच्या काळात अनेक ठिकाणी रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. उन्हात बाहेर पडणे टाळून सकाळीच कामे उरकती घेतली जात आहेत. काही जण संध्याकाळी घराबाहेर पडताना दिसतात.

राज्यातील इतर शहरांतील तापमान
सोलापूर 44.3, औरंगाबाद 41.6, परभणी 44.8, बीड 43.7, अकोला 44.6, अमरावती 43.0, चंद्रपूर 45.8, गोंदिया 43.5, नागपूर 44.2, नाशिक 40.2, जळगाव 43.4, कोल्हापूर 40.4.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.