न्यूयॉर्क : अपघात झाल्यानंतर जखमींना किंवा अत्यावश्यक सेवेसाठी वेळेत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत मोलाचे काम करते. कारण हे रुग्णवाहिका चालवणारा चालकही आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो. परंतु, विचार करा जर एका रुग्णवाहीका चालकालाच आपल्या कुटुंबातील सदस्याचा मृतदेह उचलावा लागला तर…होय अशीच एक घटना घडली आहे.
मलेशियातील एका रुग्णावाहिका चालकाला रस्त्यावर मोठा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो कर्तव्य बजावण्यासाठी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेला. मात्र, अपघातच्या ठिकाणी जाताच त्याला मोठा धक्का बसला कारण रस्त्यावर त्याच्याच मुलाचा मृतदेह पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्माईल असं ४९ वर्षीय रुग्णवाहिका चालकाचं नाव असून तो सुंगाई टोंग हेल्थ क्लिनिकमध्ये कार्यरत आहे. इस्माईल यांना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास एक ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. इमरजन्सी कॉलमुळे ते तत्परतेने घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी घटनास्थळी असणारी आपल्या मुलाची दुचाकी ओळखली आणि त्यांना आपल्या मुलाचा अपघात झाल्याचं कळालं. मात्र, मुलगा किरकोळ जखमी झाला असेल असं त्यांना वाटलं. पण दुर्दैवाने त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचं समजताच त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, “मी गेली २१ वर्षापासून रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत आहे. मात्र, आपल्याचं कुटुंबातील सदस्याला रुग्णवाहिकेतून नेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी मला काय वेदना झाल्या हे फक्त देवालाच माहीत” अशा शब्दात रुग्णवाहिका चालकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, रुग्णवाहीका चालक मोहम्मद इस्माईल यांचा मुलगा मुहम्मद ऐमान हा त्याच्या घरी जात असताना त्याने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकसोबत त्याच्या दुचाकीची धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की त्यामध्ये ऐमानचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणा आणि धोकादायक ड्रायव्हिंगमुळे मृत्यू झाल्याची नोंद केली असून. पुढील प्रकरणाचा तपास ते करत आहेत.