पुणे – महापालिकेकडून शहराच्या आरोग्य सेवेसाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात असला तरी या निधीतून पालिकेकडून केवळ शहरात मोठमोठया इमारती उभारल्या आहेत. मात्र, अशा इमारतींमध्ये हॉस्पिटलसाठीच्या आवश्यक सुविधा, पुरेसे मनुष्यबळ तसेच व्यवस्थपानासाठीचे कौशल्य नसल्याने ही हॉस्पिटल केवळ नावालाच सुरू आहेत.
हॉस्पिटल सुधारण्यासोबतच त्याला पुरेसा निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने महापालिकेकडून शहरातील तीन महापालिकेची हॉस्पिटल पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार होती. मात्र, त्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत एकही संस्था पुढे न आल्याने महापालिकेची चांगलीच कोंडी झाली आहे. महापालिकेने रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला आयुक्त विक्रम कुमार यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.
यामध्ये पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपचारांसह चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना होती. या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उत्तम उपचार, स्वच्छता, खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच अत्याधुनिक उपचार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अंतर्गत्य सिंहगड रस्त्यावरील लायगुडे हॉस्पिटल, शिवाजीनगरचे दळवी हॉस्पिटल आणि हडपसरचे मगर हॉस्पिटल महापालिका प्रशासनाकडून “अपग्रेड’ केले जाणार होते.
ही रुग्णालये पीपीपी मॉडेलवर अपग्रेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीची निविदाही आरोग्य विभागाने काढली होती. परंतु, या निविदेला कोणत्याही संस्थेकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून फेरनिविदा काढली जाणार आहे.
“महापालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी तीन रुग्णालयांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, कोणत्याही संस्थेकडून प्रतिसाद मिळाला नाही. लवकरच यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे.” – डॉ. भगवान पवार, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका