समीर भुजबळ
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील नीरा-कोळविहिरे गट-गणात सध्या शिवसेनेची सत्ता आहे. पण आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपच्या तिकिटावर गट-गणात इच्छुकांचा भरणा असून तिकिटासाठी जोरदार रसीखेच होणार यात काही वाद नाही. तर योग्य उमेदवारास तिकिट देण्यासाठी पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात जरी एकत्र असले तरी पुरंदर तालुक्यात केवळ कॉंग्रेस-राष्ट्रवादीच एकत्र असून कॉंग्रेस-शिवसेनेचे द्वंद्व रंगलेले असते. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पक्षश्रेंष्ठींकडून स्वबळाचा की महाविकास आघाडीच्या अंजेड्याखाली निवडणूक लढल्या जाणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहेत.
तरी सद्यस्थितीला सर्वच पक्ष स्वबळाच्या चाचपणीत व्यस्त दिसतात. या गट-गणात सर्वाधिक इच्छुक वाल्हे परिसरातील असल्याने “फोडाफोडी’चे राजकारण पवाहायला मिळू शकते.
नीरा-कोळविहिरे गटात आपले बस्तान भक्कम करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप कार्यकर्त्यांकडून विकास केला गेला असल्याचा दावा होत आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी जनतेला खूश करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष काय “फंडा’ वापरणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, चारही प्रमुख पक्षांमध्ये इच्छुकांची मांदियाळी असल्याने नाराजी नाट्यही घडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे इच्छुक मंडळींना आश्वासनांच्या जोरावर गप्प करणार की इच्छुक पक्षांतर करणार की थेट अपक्ष उभे राहून बंडाळी करणार हे तिकीट अंतिम झाल्यावर समजेलच; पण तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका बजवावी लागणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस : प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचा अंतिम शब्द
जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनातून वाल्हे ग्रामपंचायत व परिसरात राष्ट्रवादीकडून विविध विकासकामे सुरू आहेत. आगामी निवडणुकीत ते ठरवतील त्याच उमेदवारास तिकिट दिले जाईल. इच्छुक मंडळी जिल्हा परिषद : वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, उद्योजक सुनिल पवार. पंचायत समिती : सागर मदन भुजबळ, दीपक कुमठेकर, जयवंत भुजबळ, माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, संदेश पवार.
शिवसेना : सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील
शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांनी अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे या विकासाच्या जोरावर पुढील निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याने ते तिकीट देताना निकष लावणार, की राजकीय मंडळींच्या घरातच तिकीट देऊन घराणेशाही करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे राहिल. इच्छुक मंडळी :
जिल्हा परिषद : जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या सुनबाई उषा उमेश पवार, उद्योजक वैभव अनिल पवार. पंचायत समिती : आडाचीवाडीचे विद्यमान सरपंच दत्तात्रय यशवंत पवार, वागदरवाडी सरपंच उषा प्रदीप पवार, उद्योजक राहुल मारूती यादव, सागर अशोक भुजबळ.
कॉंग्रेस : आमदारांमुळे उजवी बाजू
आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनातून कॉंग्रेस वाल्हे परिसरात विविध कामे करीत असून आमदार कॉंग्रेसचाच असल्याने या गटात कॉंग्रेसची बाजू उजवी जरी मानली जात असली तरी महाविकास आघाडीत काय निर्णय होणार, यावर इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे. इच्छुक
जिल्हा परिषद : अमोल भुजबळ, दादाराजे म्हेत्रे, किरण भुजबळ, विकास पवार, किरण कुमठेकर, वैशाली दादासाहेब पवार, बजरंग पवार, गोरख मेमाणे. पंचायत समिती : हनुमंत भुजबळ, सुनील कदम, दत्तात्रेय पवार, अतुल पवार, शुभांगी कुमठेकर, मारूती पवार, शशिकांत दाते, संदीप दाते, राजेंद्र पवार, बाळासाहेब भुजबळ.
भाजप : सचिन लंबाते यांची भूमिका महत्त्वाची
नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटांमध्ये मागील पाच वर्षांच्या काळात भाजपचे तत्कालीन तालुका अध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली असून त्याच जोरावर भाजप जनतेसमोर जाणार आहे. यात लंबाते यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
इच्छुक जिल्हा परिषद : खरेदी-विक्री संघाचे संचालक संजय निगडे, नीरेचे माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, माजी सभापती मैना जाधव. पंचायत समिती : ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष रामदास राऊत, कोळविहीरेचे सदस्य तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास घाटे, माजी उपसभापती निलेश जगताप.