सातारा -इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून त्याखाली कमेंट केल्याच्या रागातून साताऱ्यातील एका युवतीच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावण्यात आले. तिच्या मदतीला आलेल्या तिच्या भावाच्या डोक्यालाही पिस्टल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पराग निवळे (रा. मनामती चौक, सातारा), प्रसन्न दीक्षित, दाद्या खरात (दोघेही रा. रामाचा गोट) व इतर सहा अनोळखी तरूणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवतीच्या आईने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार त्यांच्या मुलीने इंस्टाग्रामवर एकाबरोबर काढलेला फोटो दि. 7 ऑक्टोंबर रोजी 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास पोस्ट केला. त्याखाली “”मिस यु भैय्या” असे लिहिले होते. मात्र, संशयितांनी गैरसमजातून वेगळेच काहीतरी वाचले आणि ते फिर्यादीच्या घरी गेले. त्यापैकी पराग निवळे याने मुलीच्या डोक्याला पिस्तुल लावून तिचा इंस्टाग्राम आयडी व पासवर्ड नंबर मागण्यास सुरूवात केली.
त्याला तिने विरोध केल्याने चिडलेल्या परागने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिथे असलेला मुलीचा भाऊ मध्ये पडल्याने निवळेने त्याच्याही डोक्याला पिस्टल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षम मुल्ला तपास करत आहेत.
====================