प्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा
पिरंगुट – बारामती लोकसभा मतदारसंघ हा प्लॅस्टिक मुक्त करून कचऱ्यावर नियंत्रण आणायचे आहे. मुळशी तालुका हा निसर्ग संपन्नतेने नटलेला असून घाटामध्ये तसेच इतर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा टाकला जातोय. त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना समजून सांगा, नाही ऐकले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि खासदार सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी खासदारांना प्रश्न विचारले. त्यामध्ये पिरंगुट कॅम्प ते महाविद्यालय रस्त्याचे रुंदीकरण, विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करून देणे, बाहेरगावाहून शिकण्यास आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह यांसह अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी यावेळी खासदारांना विचारले.
यावेळी सविता दगडे, राजाभाऊ हगवणे, रणजित शिवतरे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, प्रविण चोळके, राष्ट्रवादीच्या तालुका महिला अध्यक्षा दिपाली कोकरे, बाजार समितीचे उपसभापती दगडूकाका करंजावणे, माजी सभापती राधिका कोंढरे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, बाबाजी शेळके, युवक कार्याध्यक्ष राहुल पवळे, प्रशांत रानवडे, जितेंद्र इंगवले, विद्यार्थी अध्यक्ष प्रसन्न ओझरकर, अथर्व पवळे, चेतन गोळे, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.