लखनौ : खुनाचा गुन्हा नोंद असणाऱ्या आरोपीने पोलिस दलांत तब्बल 19 वर्ष सुखाने सेवा बजावल्याची धक्कादायक बाब उत्तराखंडमध्ये उघडकीस आली आहे. आता या पोलिसांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून बडतर्फ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तराखंड पोलिसांनी पंतनगर पोलिस ठाण्यात या मुकुंद कुमार या हवालदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या 1997 मध्ये खुनाच्या प्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा उत्तर प्रदेशातील बरेली येथे नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्याने चार वर्षांनी म्हणजे 2001मध्ये पोलिस भरतीसाठी अर्ज केला हाता , असे पंतनगरचे पोलिस अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले.
भरती होताना त्याचा मुळ पत्ता बदलला होता. तो त्याने उत्तराखंडमधील किच्चा जिल्ह्यातील सेहदोरा गावातील असल्याचा दिला होता. तो सध्या अलमोरा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.