मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याच्या फौजी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
यामुळेच त्याला हेमा मालिनी यांनी दिल आशना है या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्याला दिवाना या चित्रपटाची ऑफर आली. त्याने दिल आशना है या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी ‘दिवाना’ हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला असल्याने ‘दिवाना’ त्याचा पहिला चित्रपट ठरला.
बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसला नाही. ‘झिरो’ चित्रपटानंतर त्याचा कोणताही चित्रपट झळकला नाही. गेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. सतत येणा-या अपयशामुळे शाहरुख सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट निवडताना खूपच सावधगिरी बाळगत आहे. त्याने आत्तापर्यंत कोणत्या चित्रपटाची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे त्याच्या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये मोठी आतुरता पाहायला मिळतेय.
सोशल मीडियावर विविध हॅशटॅग वापरून शाहरुखला चित्रपटाच्या घोषणेसाठी मागणीही करण्यात येत आहे. मात्र, आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरुख एक नाही, तर दोन चित्रपटांची घोषणा लवकरच करणार आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, शाहरुख त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटांची घोषणा करणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटामध्ये तो भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर, एस. शंकर यांच्याही एका चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच शाहरुखने एका कार्यक्रमात सांगितलं होतं, की लवकरच तो त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. सध्या तो चित्रपटाच्या कथानकावर काम करत आहे. त्यामुळे आज वाढदिवशी तो चाहत्यांना सरप्राईझ देऊ शकतो, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.