कामशेत हद्दीतील स्थिती : रस्त्यावरील खड्डे ठरताहेत वाहतुकीस अडथळा
कामशेत – कामशेत हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. वाढलेले हे खड्डे वाहतुकीस अडसर ठरत असल्याने याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. कामशेत हद्दीतील जुना पुणे-मुंबई महामार्गावरील पवनानगर फाट्याजवळ मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आलेली आहे.
महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यापूर्वी सेवा रस्त्याची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात आलेली होती. यामुळे मागील तीन वर्षांत सेवा रस्त्यावर वारंवार मोठ-मोठे खड्डे निर्माण होत आहेत. ठेकेदार त्या ठिकाणी तात्पुरती खडी-मुरूम टाकून ठिगळे लावण्याचे काम करताना दिसत आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर निर्माण झालेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीस संथगती येऊन वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्वस्त आहे, तसेच याठिकांचे खड्डे मोठे असल्याने लहान मोटारी रस्त्याला घासत असल्याने अनेक वाहनचालक खड्डे वाचविण्यासाठी वाहने बाजूने काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र महामार्गालगत उघड्या ठेवलेल्या नाल्यात वाहने जाऊन अपघात घडत आहेत.
कामशेत हद्दीतील महामार्गास पुणे मार्गावर कामशेत खिंडीतून तीव्र उतार असल्याने वाहने वेगात येतात आणि वळण असल्याने महामार्गावरील सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम वाहन चालकाच्या लक्षात येत नाही. तसेच महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सूचना फलक व दिशादर्शक फलक न लावल्याने या ठिकाणी अपघातात वाढ होत आहे. गेल्या महिन्यात या भागात खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा बळी गेला होता. तर वेगवेगळ्या अपघातात या ठिकाणी पुलाचे काम सुरू झाल्यापासून अनेकदा अपघात झाले आहेत.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खड्डे भरण्याच्या व ठिकठिकाणी सूचना फलक लावण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार खड्डे भरले जात आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता
शंकर सावंत यांनी दिली.