राजगुरूनगर : खेड तालुक्यात २४ तासात ६६ व्यक्तीचे स्वब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ७३८ वर पोहचली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.तालुक्यात करोना समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागला असल्याने तालुक्यात करोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यात करोना घोडदौड सुरूच आहे. त्याला थोपवण्यात आतापर्यंत मोठे अपयश आले आहे. दररोजची वाढती संख्या लक्षात घेता तालुका करोनामय झाला आहे. नागरिकांमध्ये भीती राहिली नसल्याने करोना समूह संसर्ग वाढला आहे. दिवसागणिक बाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून अधिकारी डॉक्टरसह सर्व वर्गातील नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे.
२४ तासात तालुक्यातील चाकण १९, आळंदी १२, राजगुरूनगर ३ करोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडले आहेत. तालुक्यातील कुरुळी (३ व्यक्ती), कान्हेवाडी (१ व्यक्ती), येलवडी (२ व्यक्ती), मोई (४ व्यक्ती), केळगाव (१ व्यक्ती), वडगाव घेनंद(२ व्यक्ती), बहुळ (१ व्यक्ती), भोसे(४ व्यक्ती), मरकळ(२ व्यक्ती), शेलगाव (३ व्यक्ती), रोहकल(६ व्यक्ती), सातकरस्थळ(१ व्यक्ती), दोंदे(१ व्यक्ती), आखरवाडी(१ व्यक्ती) अशा ३२ व्यक्ती तालुक्यातील १४ गावांमध्ये मागील २४ तासामध्ये करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.