हाथरस: विरोधकांकडून गरिबांच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण – योगींचा घणाघात

लखनौ – उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विरोधक गरिबांच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण करून सामाजिक ऐक्यावर घाला घालत असल्याचा गंभीर आरोप लगावला.

“गरिबांच्या मृतदेहांवर घाणेरडे राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे समोर येत आहेत. उत्तर प्रदेश सरकार अशांची ओळख पटवून त्या सर्वांवर कडक  कायदेशीर कारवाई करेल.” असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला.

येत्या ३ नोव्हेंबरला उन्नाव येथील बांगरमाऊ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. याच निमित्ताने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते बोलत होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून विरोधक योगी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. अशातच योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

“हे लोक तेच आहेत जे गरिबांना केवळ व्होट बँक समजतात. यांच्यासाठी विकास, गरिबीचे उच्चाटन या गोष्टी केवळ निवडणुकांसाठीचे जुमले आहेत.”

यावेळी योगींनी विरोधकांना उद्देशून, त्यांच्यासाठी राजकारण हा केवळ धंदा असून तो चालवण्यासाठी ते कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात, असा आरोप लगावला.

“विरोधक सर्वकाही जात, धर्म आणि प्रदिशकतेच्या चष्म्यातून बघत असतात. समाजासाठी घटक असलेली ही लोकं आपली व्होट बँक साबूत राखण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करून समाजातील ऐक्याच्या भावनेला बाधा आणू शकतात.”

“त्यांचे घातक मनसुबे आपण सफल होऊ देणार नाही याची जनतेला खात्री द्यायला हवी” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या साडेसहा वर्षांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व विकास झाल्याचंही ते म्हणाले.            

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.