नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार दिल्लीत पुन्हा पाच साल केजरीवाल असे चित्र निकालातून पुढे येणार का, याविषयी मोठी उत्सुकता आहे.
दरम्यान, दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांचे कल समोर आले असून सध्याच्या स्थितीनुसार आप 56 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर आहे. निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असतानाच आपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला आहे, तर दुसरीकडे भाजप पक्षाने पराभव स्वीकारला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागवण्यात आलेला एक पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे.
या पोस्टरमध्ये लिहिले आहे की,”विजयामुळे आम्ही अहंकारी होत नाही अन् पराभवामुळे निराश होत नाही.’ अमित शहांचा फोटो असणारं हे पोस्टर आता व्हायरल होत असलं तरीही हे पोस्टर 2 वर्षांपूर्वीचं असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांचेही असेच फोटो लावण्यात आले आहेत.’