पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या घरासमोर मारली बसकण
बेंगळूरु : कौटुंबिक वादातून आपल्या मुलांच्या भेटीसाठी पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या घरासमोरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने धरणे आंदोलन करण्याचा नाट्यमय प्रसंग आज घडला. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्याच पूर्वाश्रमीच्या पत्नीने पोलिसांनाच पाचारण केले.
अरुण रंगराजन असे धरणे आंदोलन करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते कलबुर्गी येथील अंतर्गत सुरक्षा विभागाचे पोलीस अधिक्षक आहेत. रंगराजन यांची पूर्वाश्रमीची पत्नी इलाक्किया करुणागरन या देखील गृहरक्षक दलातील डेप्युटी कमांडंट जनरल पदावर कार्यरत आहेत. रंगराजन हे आपल्याशी भांडत असल्याची त्यांची तक्रार आहे. कौटुंबिक वादामुळे इलाक्किया करुणागरन या विभक्त झाल्या आणि वेगळे राहू लागल्या. आपल्या मुलांना भेटण्यासाठी आलेल्या रंगराजन यांना मुलांची भेट नाकारण्यात आली.
त्यावर रंगराजन यांनी करुणागरन यांच्या घरासमोरच धरणे आंदोलन सुरू केले. पोलिसांना पाचारण केल्यावर पोलिसांनीच रंगराजन यांची समजूत घातली आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. “मी कोणताही गोंधळ आहे का ? मी कोणालाही त्रास देत नाही. मी केवळ इथे बसून राहिलो आहे.’ असे रंगराजन यांनी सांगितले. या नाट्यमय घडामोडीचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांचा फौजफाटाही जमा झाला होता. आपण काही भांडण केले आहे का ? असा प्रश्न रंगराजन यांनी पत्रकारांनाच विचारला. त्यांनाच हटवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही त्यांनी हाच प्रश्न विचारला.
या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना नक्षलप्रभावित छत्तीसगढमध्ये नियुक्त केले गेले होते. तेथेच त्यांचा विवाह झाला होता. वर्षभरानंतर मतभेदामुळे रंगराजन यांच्या पत्नींच्या आग्रहाखातर त्यांनी कर्नाटकमध्ये बदली करून घेतली. त्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याचे रंगराजन यांनी सांगितले. दोन्ही मुलांची भेट घेण्याची परवानगी मिळाल्यावर त्यांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले.