नवी दिल्ली – नुकतेच आम आदमी पक्षातून (आप) बाहेर पडलेले हरियाणातील नेते अशोक तंवर यांनी शनिवारी सत्तारूढ भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तंवर (वय ४८ वर्षे) यांच्यासारख्या तरूण दलित नेत्याची साथ भाजपला उपयुक्त ठरणारी आहे.
कॉंग्रेसच्या माध्यमातून तंवर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्या पक्षाचे ते हरियाणातील प्रदेशाध्यक्षही बनले. मात्र, राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबरचे मतभेद विकोपाला गेल्याने त्यांनी २०१९ यावर्षी कॉंग्रेसला रामराम ठोकला.
माजी खासदार असणाऱ्या तंवर यांनी स्वतंत्र पक्षही स्थापन केला. मात्र, त्या पक्षाचा प्रभाव पडला नाही. त्यामुळे अल्पकाळ तृणमूल कॉंग्रेसमध्ये राहून त्यांनी २०२२ मध्ये आपमध्ये प्रवेश केला. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आप आणि कॉंग्रेसमध्ये हातमिळवणी जवळपास निश्चित झाली आहे. त्याचे कारण देऊन तंवर नुकतेच आपमधून बाहेर पडले. आता त्यांनी भाजपची वाट धरली आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. त्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल.