वडगाव मावळ -ग्रीस- हेराकिलॉन येथील स्पर्धेत भारतासाठी वडगाव मावळ येथील हर्षदा गरूड हिने पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. हिने 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून वेटलिफ्टिंगची पंढरी असलेल्या वडगावचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर झळकविले.
हर्षदा शरद गरुड ही वडगांव मावळ येथील दुबेज गुरुकुलमध्ये क्रीडा प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून तिने सन 2019 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई ज्यूनिअर स्पर्धेत कास्य पदक मिळविले होते. वडगाव मावळ नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याची मुलगी व दुबेज गुरुकुलची खेळाडू असलेल्या हर्षदाच्या या यशाचे देभरातून कौतुक होत आहे. हर्षदाने तिची निवड सार्थ ठरविल्याबद्दल बिहारीलाल दुबे यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान हर्षदाच्या या यशाचे संपूर्ण मावळ तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत भारताने यापूर्वी सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल अशी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र कन्येचा हा पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी हर्षदाचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, ग्रीस-हेरकिलॉन येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षदाने देशासाठी पाहिले सुवर्णपदक जिंकले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला असून तिच्या या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.