पुणे- करोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करोना चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना पुणे जिल्हा परिषदेने आरोग्य विभागाला दिल्या आहेत. ग्रामीण भागात तापाच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुका आणि गावपातळीवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सध्या दाखल रुग्ण, गंभीर रुग्ण, रुग्णसंख्या आकडेवारीच्या दृष्टीने कमी असली, तरी त्यात वाढ होत आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ऑनलाइन बैठक घेतली. त्यावेळी करोनाचा राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात तयारी सुरू केली जात आहे.
आरोग्य विभागाला सूचना
*एकाच ठिकाणी 3 ते 7 बाधित आढळल्यास त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करावे.
*त्यासाठी चाचण्यांचे नमुने बी. जे. मेडिकल कॉलेजकडे पाठविण्यात यावेत
*जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रावर लसीकरण केंद्रे दररोज सुरू ठेवा
*12 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचा पहिला आणि दुसरा डोस येत्या सात दिवसांच्या आत पूर्ण करावा.
*शाळानिहाय लसीकरण सत्राचे आयोजन करावे.