-तुषार घाडगे
आयपीएलमध्ये दोन सामने खेळल्यानंतरही कारकिर्दीत कोणतीही आशा दिसत नसल्याने पंजाबमधील मोगा येथील 24 वर्षीय युवा फिरकीपटू हरप्रीतसिंग ब्रारने कॅनडाला जाण्याचा विचार केला होता. सध्या त्याची आई गुरमीत कौर आणि एक बहीण ही कॅनडामध्ये स्थायिक आहेत. पण नियतीने काहीतरी वेगळेच लिहिले होते. तो कॅनडाला जाण्यापूर्वीच पंजाब किंग्जने हरप्रीतसिंग ब्रारला तिसऱ्यांदा खेळण्यासाठी बोलविले.
मग काय, आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा पदार्पण करत हरप्रीतने अशी कामगिरी करून दाखविली की, पंजाबच नव्हे तर संपूर्ण देश या नवीन “किंग’च्या प्रतिभाशाली खेळाने प्रभावित झाला. आयपीएलमध्ये त्याने पहिलीच विकेट ही जगातील आघाडीचा फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत घेतली. कोहलीच्या विकेटने उत्साहित असलेल्या हरप्रीतने ग्लॅन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना बाद करत स्वतःमधील कर्तबगारी सिद्ध करून दाखविली.
हरिएवाला येथील मूळ रहिवाशी असलेला हरप्रीतसिंग हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. वयाच्या सातव्या वर्षापासूनच हरप्रीतसिंगला क्रिकेटची आवड होती. तसेच 2003च्या विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने क्रिकेटपटू होण्याचा निश्चय केला. तसेच प्रशिक्षणासाठी ऍकॅडमीही जॉइन केली. यानंतर त्याने मोहालीकडून जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली.
हरप्रीतसिंग हा पंजाबकडून अंडर-23मध्येही खेळला आहे. परंतु वरिष्ठ संघात त्याची निवड होऊ शकली. तसेच आयपीएलमध्ये पंजाबकडून चार वेळा ट्रायल दिली, परंतु प्रत्येकवेळी रिजेक्ट करण्यात आले. यानंतर निराश झालेल्या हरप्रीतसिंगने कॅनडाला जाण्याचा विचार केला होता. अशातच पंजाब किंग्सने 20 लाखात हरप्रीतसिंगला खरेदी करत एक संधी दिली. दरम्यान, 2019मध्ये दोन, तर 2020मध्ये त्याने एक सामना खेळला होता. यानंतर तिसऱ्यांदा मिळालेल्या संधीचे त्याने सोनं केलं.
यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हरप्रीतसिंगने पहिला सामना खेळला. यात त्याने प्रथम फलंदाजी करत 17 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार खेचत 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच गोलंदाजीतही त्याने संघाचे मनोबल वाढविले. हरप्रीतने प्रथम कर्णधार विराट कोहलीला बाद केले. त्यानंतर बंगळुरूचा मॅच विनर खेळाडू ग्लॅन मॅक्सवेलला आपल्या जाळ्यात अडकविले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर हरप्रीतने एबी डिव्हिलियर्ससारख्या आक्रमक फलंदाजालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. हरप्रीतसिंगच्या अष्टपैलू खेळीमुळे बंगळुरूचे सहाव्या विजयाचे स्वप्नदेखील भंगले.
हरप्रीतसिंगच्या या कामगिरीमुळे पंजाबने स्पर्धेत आपले आव्हान अद्याप कायम ठेवले आहे. हरप्रीतसिंगने आपल्या खेळात सातत्य ठेवल्यास तो लवकरच भारतीय संघातही स्थान मिळवू शकेल, अशी अपेक्षा आहे.