कापूरहोळ, (वार्ताहर) – हरिश्चंद्री ता. भोर येथील हरिश्चंद्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमासाठी शाळा परिसर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी खचाखच भरून गेला होता.
या समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन,छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजनाने झाली. या स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीला अनुसरून पोवाडा, भजन, एकपात्री प्रयोग, भारुड, नाटिका, जुन्या-नवीन हिंदी गाण्यांवर आधारित रेकॉर्ड डान्स, रामायणावर आधारित गीत, राजा शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास यावर आधारित बहारदार गीतांचा समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या मांदियाळीत मुलांनी भरभरून आनंद लुटला. अतिशय आल्हाददायक आणि आनंदी वातावरणात स्नेहसंमेलन संपन्न झाले. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, जय हनुमान तरुण मंडळ, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व सदस्य, महिला बचत गट, विविध विकास सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन संचालक गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ग्रामस्थ,महिला, पालक,विद्यार्थी तरुण,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले. पालकांनी ,ग्रामस्थांनी शाळेच्या कार्यावर आणि शिक्षकांवरील विश्वास व्यक्त करणारी भाषणे केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.