फुलांना बाजारभाव मिळाल्याने शेतकरी सुखावला
सोरतापवाडी- सोरतापवाडी परिसरातील फूलशेतीला सुगीचे दिवस आले आहेत. नवरात्रोत्सवात फुलांना बाजारभाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी सुखावला आहे. झेंडू 40, शेवंती 160, गुलाब गड्डी 35, गुलछडी 250, लिली 12, आस्टर 25, असा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे अजून महिनाअखेरपर्यंत फूलबाजार तेजीत राहणार आहे. फुलशेतीने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवली आहे. सण-उत्सवांसाठी फुले पुरविण्यास येथील शेतकरी कायम सज्ज झाल्याची साक्ष फुललेले ताटवे देत आहेत.
पुणे, मुंबईसह देशातील प्रमुख शहरांत फुले पुरविण्यासाठी शेतकरी प्रसिद्ध आहेत. फुलशेतीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमिन सोरतापवाडी परिसरात उपलब्ध आहे. आर्थिक संकटे आली तरी शेतकरी पिढ्यान्पिढ्या शेती करीत आहेत. लोणी काळभोर येथील एका रासायनिक कारखान्यातील धुरामुळे गुलाबाचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
- सोरतापवाडी परिसरात शेतकरी बाजारभाव मिळाल्यामुळे सुखावला आहे. आम्ही फुलशेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. येथील फुलांना पुणे, मुंबई शहरातील बाजारपेठेत मागणी आहे. यावेळी निसर्गाची कृपा व बाजारभावाची साथ लाभली आहे. म्हणून हा हंगाम शेतकऱ्यांना चांगला आहे. दिवाळीत समाधानकारक बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना अजून दिलासा मिळणार आहे.
– भाऊसाहेब चौधरी, फुल उत्पादक शेतकरी.